बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग

बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग 
( पुस्तकाचे नाव जेव्हा आभाळ फाटले : लेखक :- पी .बी .पिसाळ )

" धुंदीत काम करू नका " 

बाबासाहेबांचा मुक्काम पुण्यातील अहिल्याश्रम मध्ये होता. पुण्यातील कार्यकर्ते बाबासाहेबांना सतत विनंती करीत होते....

' बाबा , आपले माटे मास्तर ब्राम्हण असून देखील सतत आपल्यामध्ये काम करतात. आपल्या महारवाड्यात येवून मुलांना शिकवितात . लोकांना स्वच्छतेचे धडे देतात, प्रौढ शिक्षण वर्ग घेतात. शिवा-शिव न मानता सतत आपल्या लोकांत वावरतात . त्यामुळे इतर स्पृश्य वर्ग त्यांना 'महार माटे ' असे म्हणून हिणवीतो. त्यांचा आपल्या हाताने सत्कार व्हावा असे आम्हां पुणेकरांना वाटते , आणि त्यांना हि आपल्या कामाचे चीज झाले असे वाटेल. त्यामुळे ते आणखी हुरुपाने काम करतील,

बाबासाहेब सतत या विनंतीला चाल-ढकल करीत होते परंतु या वेळी लोकांनी हट्टच
धरला , बाबासाहेब म्हणाले .
' चला तुमच्या मनासारखे होवू द्या ! बोलवा त्या माटे मास्तरला '

कार्यकर्त्यांची धावा धाव झाली . श्री .म.माटे यांना शोधून बाबासाहेबांसमोर हजर केले . माटे देखील मनातून अतिशय आनंदित झाले होते; कि एका महामानवाकडून माझा सत्कार होणार आहे, बाबासाहेबांना नमस्कार करून श्री .म. माटे एका बाजूला उभे राहिले.
उभ्या असलेल्या माटे मास्तरांना बाबासाहेब म्हणाले ,

' माटे मास्तर मी तुमचा अत्यंत आभारी आहे .तुम्ही आमच्या वस्तीत येता ,लोकांना स्वच्छतेचे धडे देता,माझ्या लोकांना शिकविता , जातीयता पाळत नाही , हे सर्व ऐकून फार बरे वाटते. तुमचे हे कार्य पाहून तुमचा सत्कार माझ्या हातून करावा ,असे माझ्या पुण्यातील कार्यकर्त्यांचे मत आहे. परंतु माटे मास्तर , मी तुम्हांला काही प्रश्न विचारतो त्यांची तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे द्याला का ?'

' होय बाबासाहेब ' श्री .म. माटे म्हणाले.

' माटे मास्तर मी असे ऐकले आहे ते खरे आहे का ? कि तुम्ही आमच्या वस्तीतून घरी गेल्यानंतर तुमची पत्नी तुम्हांला दारात उभी करते, तुमच्या अंगावरचे कपडे दारातच उतरविल्यानंतर त्या कपड्यांवर व तुमच्या अंगावर गोमुत्र शिंपडल्यानंतर तुम्हांला घरात प्रवेश देते, तसेच तुमची पत्नी तुमचे कपडे तुम्हांलाच न्हाणी घरात ठेवायला सांगते आणि तुम्ही आंघोळ केल्याशिवाय ती तुम्हांला स्पर्श हि करीत नाही .'

' होय बाबासाहेब , हे सर्व सोपस्कार झाल्यानंतरच मला घरात प्रवेश मिळतो.' माटे मास्तर म्हणाले .

' तर मग, माटे मास्तर ! मला वाटते ज्यांना आपली स्वतःची बायको अथवा आपले घर सुधारता येत नाही, त्यांनी समाज सुधारण्याच्या गप्पा मारू नयेत .' बाबासाहेब गर्जले.

हे सर्व ऐकल्यानंतर पुण्यातील कार्यकर्ते आवाक॒ झाले . बाबासाहेब केव्हा तरी पुण्यात येतात . आपण सतत पुण्यात असूनही आपल्याला हे कसे माहित नव्हते.

त्या आश्चर्यचकित झालेल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब म्हणाले ....
' कार्यकर्त्यांनी सतत जागरूकपणे काम करावे . कामाच्या धुंदीत , नशेत काम करू नये.

! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह