शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग होय !!

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग होय !!
जातिभेदाच्या अनेक दु:खद अनुभवांनी पोळलेल्या छोटया भीमाने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली. अत्यंत मन लाऊन त्याने अभ्यासात लक्ष घातले. त्याच्या वडिलांना फार आनंद झाला. आपल्या मुलाची वाचनाची गोडी पाहिल्यावर आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या मुलाला आवडतील ती पुस्तके खरेदी करून दिली. वेळप्रसंगी पैसे उधार घेऊन,आपल्या विवाहित मुलीच्या घरी जाउन लग्नात दिलेले दागिने मोडून त्यांना त्यांनी पैसे उभे करण्यास भाग पाडले. अर्थात या सर्व उधारीची त्यांनी परतफेड केली. शिक्षकांचा सल्ला आणि स्वत:चा आतला आवाज यावर त्यांनी निर्धार केला की आपल्या मुलाला विद्वान करायचेच. एलफिस्टन हायस्कूल या त्या काळच्या अव्वल क्रमांकाच्या शाळेत दाखल झाल्यावर भीमाने अभ्यासात जीव ओतला. कसून अभ्यास केला. घरात अभ्यासासाठी शांत निवांत जागा नव्हती. मुंबईच्या परळ भागात जुन्या चाळीतल्या एका खोलीत तर बिऱ्हाड थाटलेले होते. सगळ्या वस्तू, भांडीकुंडी, चूल, स्वैपाक घर, झोपण्याची खोली, अभ्यासाची खोली असा संसाराचा पसारा त्या एकाच खोलीत होता.
भीमाच्या अभ्यासाची जागा तीच होती आणि विश्रांतीची जागाही तीच होती. डोक्यापाशी भिंतीला जाते उभे तर पायापाशी बकरी बांधलेली होती. रात्री उशिरा बाबा त्याला झोपायला सांगत. आणि स्वत:मात्र भीमाला सकाळी अभ्यासाला उठवायचे म्हणून दोन वाजेपर्यंत ताटकाळत जागून काढत असत. भीमा उठल्यावर ते झोपत असत. भीमा त्यानंतर पहाट फुटेपर्यंत रॉकेलच्या बिनकाचेच्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. थोडीशी झोप घेऊन आंघोळ न्याहारी आटपून तो शाळेकडे धाव घ्यायचा. आश्चर्य म्हणजे सरकारी असले तरीही एलफिस्टन हायस्कूलसुद्धा जाती भेदापासून मुक्त नव्हते. तेच जुनाट पूर्वग्रह, तिरस्कार, अवहेलना आणि अपमान.
एके दिवशी भीमाला एक उदाहरण सोडविण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याला फळ्याजवळ बोलावले. शिक्षकाच्या इच्छेनुसार भीमा जेव्हा फळ्याकडे आला तेव्हा वर्गात अभूतपूर्व गदारोळ व हलकल्लोळ झाला. ज्यांनी आपल्या न्याहारीचे डबे फळ्याआड ठेवले होते अशा उच्च जातीच्या मुलांना भीती वाटली की अस्पृश्य असलेल्या भीमाने फळ्याला हात लावला म्हणजे त्यांचे डब्यातील अन्न विटाळेल. भीमा तिथे पोहोचण्यापूर्वी सारी मुले तेथे झेपावली आणि आप आपले डबे ताब्यात घेतले. हि बातमी जिकडे तिकडे चर्चेचा विषय झाली आणि उच्च जातीतील पालकांपर्यंत पोहोचली. वर्ग शिक्षकांची मजल तर एव्हढी पुढे गेली की, भीमाने शिक्षण घेणे कसे मूर्खपणाचे आणि निरर्थक आहे हे त्यांनी त्याच्या लक्षात आणून दिले. शिक्षकाच्या गैरवर्तनाचा आणि मुलांच्या चिडवण्याचा भीमाला एव्हडा प्रचंड राग आला की त्या तिरमिरीतच तो एक दिवस उठला आणि वर्गशिक्षकास त्याने 'तुंम्ही आपले काम करा' असे खडसावले अशा अपमानकारक प्रसंगांचा प्रभाव भीमाच्या मनावर आयुष्यभर टिकून होता.
संदर्भ पुस्तकं - १) डॉ.आंबेडकर; लाइफ़ & मिशन. पृ. १७ (२)कित्ता पृ. १५ .

संपादित लेखं- विवेक घाटविलकर सर.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह

ग्रंथालय

नेटवर्क ऐतिहासिक पाश्र्वभूमी