स्वबळावर चालणार्या अभ्यासक्रमांचा आढावा
स्वबळावर चालणार्या अभ्यासक्रमांचा आढावा
| ||
पुणे विद्यापीठाने नेमली समिती
| ||
न चालणार्या अभ्यासक्रमांचाही लेखाजोखा जे अभ्यासक्रम केवळ नावाला सुरू आहेत व त्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविलेली आहे, अशाही अभ्यासक्रमांचा एकत्रित आढावा घेण्यासाठी डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे न चालणारे, अगर काळाच्या प्रवाहात मागे पडलेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णयही विद्यापीठ स्तरावर घेतला जाण्याची शक्यता आहे. पुणे। दि. ५ (प्रतिनिधी)
पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये स्वबळावर चालविल्या जाणार्या स्वयंसहायता अभ्यासक्रमांचा आढावा घेतला जात आहे. पुणे विद्यापीठाने त्यासाठी एक समिती नेमलेली असून, त्या माध्यमातून अशा अभ्यासक्रमांची सद्य:स्थिती समोर येईल. पुणे विद्यापीठात अनेक विभागांमध्ये सध्या असे अनेक अभ्यासक्रम चालविले जातात; मात्र त्यांची सद्य:स्थिती काय, आर्थिकदृष्ट्या किती अभ्यासक्रम यशस्वी ठरलेले आहेत, त्यांना एकूण प्रतिसाद कसा आहे, एकूण विद्यार्थिसंख्या किती आहे, किती वर्षांपासून हे अभ्यासक्रम चालविले जातात याचा एकत्रित आढावा आत्तापर्यंत कधी घेण्यात आलेला नव्हता. आता तो घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून, येत्या महिनाभरात ते त्यांचा अहवाल विद्यापीठाला सादर करणार आहेत. त्यातील जे अभ्यासक्रम चांगल्या रीतीने अनेक वर्षांपासून कार्यान्वित केलेले आहेत त्यांतील शिक्षकांची पदे नियमित करून वेतनाचे लाभ मिळावेत, असा प्रस्ताव विद्यापीठाच्या वतीने शासनाला दिला जाईल. पुणे विद्यापीठामध्ये अनेक अभ्यासक्रम अनेक वर्षांपासून कोणत्याही अनुदानाविना सुरू आहेत; परंतु एकूण विभागावर होणारा खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न हे परस्परविरोधी आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम चांगले असले तरीही केवळ स्वबळावर किती काळ चालवत राहणार, हा प्रश्न आहे. अशा अभ्यासक्रमांना शासनाचे पाठबळ मिळावे, अशी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची भूमिका आहे. |
Comments
Post a Comment